April 20, 2026 1:03 am

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उंच भरारी शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दि. 18 : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याव्दारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादीव्दारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी कृषि विभागाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे-राज्य पुरस्कृत योजना सन 2025-26 ही योजना आयोजित केली आहे, त्यानुसार सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँडस, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, चीन व दक्षिण कोरिया इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातून किमान एक महिला शेतकऱ्याची, विविध कृषि पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि इतर शेतकरी निवड करावयाचे आहेत. कृषि विभागामार्फत निवड केलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. निवड झाल्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक आहे. सदरची रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाव्दारे प्रवासी कंपनीस अदा करणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांना देय असलेले 50 टक्के शासकीय अनुदान कमाल एक लाख रुपये अभ्यास दौरा पूर्ण करुन परत आल्यानंतर व आवश्यक ती कागदपत्रे (प्रवासाचे विमान तिकीट बोर्डींग पास, शेतकऱ्यांचे दौऱ्याबाबत सकारात्मक अभिप्राय इ.) दौऱ्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतरच प्रवासी कंपनीच्या बँक खात्यात कृषि आयुक्तालयमार्फत जमा करण्यात येईल.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज वैध पारपत्रधारक (Passport), फार्मर आयडी, सातबारा, 8 अ, आधारकार्ड, शिधापत्रिका व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 25 जुलै, 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जामधून सोडत काढून निवड करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारो कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें