हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली :महायुती सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय (जीआर) ओबीसी आरक्षण संपवणारा आहे. त्यामुळे ज्या सत्ताधारी व विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे त्यांना आम्ही धडा शिकवणार, असा इशारा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बुधवारी दिला.
हिंगोलीत बुधवारी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, औंढा नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हाके यांनी वरील संताप व्यक्त केला. ते म्हणाले, सरकारने मराठा आरक्षण करण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढला. हा जीआर ओबीसी आरक्षण संपवणारा आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांनी हा जीआर रद्द करावा. अन्यथा ओबीसी आरक्षण संपण्याची भीती आहे. आज हिंगोलीत ज्या कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, ते रद्द करावे ही आमची मागणी आहे. ज्या सत्ताधारी व विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे, त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. केवळ डीएनए ओबीसी आहे असे म्हणून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी तो आपल्या कर्तुत्वाने दाखवला पाहिजे असे लक्ष्मण हाके म्हणाले
हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल, तर वाडी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजालाही आपल्याला एसटीचे आरक्षण मिळेल असे वाटू शकते. बंजारा समाजाने आपल्या ताटातील आरक्षण वाचवणे हे महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अगोदर आपली झोपडी वाचवू. आपल्यात फूट पडेल असे कोणत्याही समाजाने वागू नये. आज आपली उद्ध्वस्त झालेली झोपडी वाचवण्यासाठी एकत्र येऊ या. महाराष्ट्रातील 450 जातींनी कारखानदारांनी उद्ध्वस्त केलेली झोपडी वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हाके म्हणाले.
*मनोज जरांगेंवरही साधला निशाणा*
लक्ष्मण हाके यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच त्यांच्या आंदोलनामागे विरोधक असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, विरोधी पक्षांनी एका चौथी नापास व्यक्तीला या आंदोलनाचे नेतृत्व दिले. त्याला रसद पुरवली. त्यांनी बेकायदा मागणी केली आणि सरकारनेही त्याच्या मागणीनुसार जीआर काढला. त्यामुळे आम्हा ओबीसींना कुणीही वाली राहिला नाही. विरोधी पक्ष नाही. सत्ताधारी पक्षही नाही. जरांगे पाटलांचे आंदोलन विरोधी पक्षांनी उभे केले. त्यांनी आंदोलन उभे केले नसते तर आमचे आरक्षण गेलेच नसते.
*मुख्यमंत्र्यांना आपला ओबीसी डीएनए कर्तृत्वाने दाखवावा लागेल*
पत्रकारांनी यावेळी हाके यांना तुम्ही नेहमीच शरद पवारांवर टीका करता, पण जीआर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे ना? असा प्रश्न केला. त्यावर हाके म्हणाले, आम्ही सरकारचा जीआर फाडून टाकला ना? त्याचे काय कौतुक करतो आम्ही ? आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. फडणवीस म्हणतात भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे. पण नुसत बोलून चालणार नाही. ते त्यांना आपल्या कर्तृत्वाने दाखवावे लागेल, असे हाके म्हणाले.













