प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली सेवासदनचा वर्धापन दिन 22 जून 2025 रोजी शिवाजीराव देशमुख सभागृहात पार पडला.
सेवासदन हे वसतिगृह निराधार मुलांसाठी आधारवड आहे. शासनाचे कुठलेही अनुदान नसताना स्वतःच्या कमाईतून आणि लोकसहभागातून हे वसतिगृह गेल्या सहा वर्षापासून चालवले जाते.
या वस्तीगृहाचा ६वा वर्धापन दिनानिमित्त आयआरएस ऑफिसर समीर वानखेडे, अनेक गोरगरीब लेकरांचे भविष्य घडवणारे प्रा विठ्ठल कांगणे सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा विठ्ठल कांगणे म्हणाले की, सेवासदनचे कार्य अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे..!! मीराताईअगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे या लेकरांवर माया करतात. सत्तर लेकरांची ही माय मला सिंधुताई सपकाळच वाटते. मला मीराताईमध्ये सिंधुताई सपकाळ दिसतात.
शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असली पाहिजे. वेळ वाया न घालवता अविरत आपल्या स्वप्नांसाठी झटत राहिले पाहिजे. व्यसनापासून, मोबाईलपासून, चुकीच्या मित्रांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. ते कोणाच्या संपर्कात राहतात याचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभारल्यानंतर या समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कार्य करत राहिले पाहिजे.
सेवासदनच्या मुलांसाठी माझ्या स्वामी विवेकानंद अकॅडमीचे दरवाजे नेहमी खुले असतील .
समाजामध्ये आपण पाहतो स्वतःचे दोन मुले लोकांना सांभाळणे जड झाले आहे.. असे असताना मीराताई आणि धनराज कदम मात्र अनेक निराधार लेकरांचे मायबाप झाले याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.
साथ फाउंडेशन तांदूळजा आणि सेवासदन परिवार यांच्यावतीने प्रा विठ्ठल कांगने सर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सेवासदनच्या चिमुकल्यांनी सादर केलेला दिंडी सोहळा सर्वांच्या काळजात घर करून गेला. सेवासदन परिवाराशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीने यावेळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी सेवासदन मधील विविध क्षेत्रात भरारी घेत असलेल्या मुलांचाही सत्कार करण्यात आला. सेवासदन मधील मुलांनी सुद्धा आपल्या भावना उपस्थितितांसमोर व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मीरा कदम व धनराज कदम यांनी आभार व्यक्त केले.













