हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानातुन चंदनाचे झाड चोरी करणारे चोरटे जेरबंद

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे 

हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानाच्या कंपाऊंड वॉलच्या आतील बाजूस असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून नेले होते. यात दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे शिवाजीनगरात शासकीय निवासस्थान आहे. कंपाऊंड वॉलच्या आतील भागात चंदनाचे झाड होते. चोरट्यांनी हे झाड तोडून नेल्याचे ११ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. याप्रकरणी शिवप्रसाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला केल्या. अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. चोरटे हे कुरूंदा येथून नर्सी फाटा मार्गे रिसोडकडे जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने नर्सी फाटा येथे सापळा लावला.

यावेळी जावेद इस्माईल कुरेशी (रा. दर्गा मोहल्ला कुरूंदा), शेख अन्वर शेख जानी (रा. नवी आबादी कुरूंदा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचे गाभ्याचे तुकडे, कुऱ्हाड, किकरा, कानस तसेच एक दुचाकी असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार प्रेमदास चव्हाण, रवीकुमार स्वामी, सतीश जाधव, सुभाष घुगे, लिंबाजी वाव्हळे, विक्रम कुंदनानी, कोंडीबा मगरे, विशाल खंडागळे, किशोर सावंत, आझम प्यारेवाले, शंकर हराळ, दत्ता नागरे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे, मारोती काकडे यांच्या पथकाने केली.

*दोन पोलिस अंमलदार निलंबित*

हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केली. या प्रकरणी कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत. साळूजी कपाटे, प्रकाश सोनटक्के अशी निलंबित पोलिस अंमलदारांची नावे आहेत. दोघांनाही १० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी गार्ड ड्युटी देण्यात आली होती. या कालावधीत चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरून नेले. गार्ड ड्युटीवर असताना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानात चोरी होणे ही बाब अत्यंत गंभीर

स्वरूपाची असून, यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. निवासस्थानात चंदनाच्या झाडाची चोरी झाली तेव्हा कर्तव्यावर हजर असल्याचे दिसून येत नाही. अत्यंत महत्त्वाची ड्युटी असताना आपण आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय पोलिस मुख्यालय हिंगोली हे राहणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें