हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली:नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 12 गडकोटांची जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोच्या यादीत नोंद करण्यात आली. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील चित्रकार सुशील घुंबरे यांनी साकारलेली रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती असलेली कॅनव्हास पेंटिंग मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
9 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, परभणीच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे पेंटिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आले. या वेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, आ. मोनिकाताई राजळे, आ. सिमाताई हिरे, आ. सुरेश धस, खासदार रणजित नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जपतो आम्ही शिवछत्रपतींचा वारसा’ असे शीर्षक असलेल्या या कलाकृतीने मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले. पेंटिंगचे कलाकार सुशील घुंबरे हे चित्रकलेचे पदवीधर असून त्यांनी अत्यंत अल्प वेळेत ही कलाकृती साकारली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीच सुशील घुंबरे यांना प्रेरित करून छत्रपती शिवराय व रायगडाच्या प्रतिकृतीचे पेंटिंग तयार करण्यास सांगितले होते. हे पेंटिंग पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घुंबरे यांच्या कलेचे मनापासून कौतुक केले व ते आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनातील भिंतीवर शोभून दिसणार आहे.
या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे हनुमान घुंबरे, चित्रकार सुशील घुंबरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या कलाकृतीसह स्मृतिचित्रेही टिपली.













