हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
हिंगोली :सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला बाजीराव खंडेराव वडकुते (७२) या शेतकऱ्याने विहिरीत उडी बाजीराव वडकुते घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे ३० जुलै रोजी सकाळी घडली. बाभूळगाव येथील शेतकरी बाजीराव वडकुते यांना सर्व्हे क्रमांक ४२० मध्ये एक हेक्टर पाच आर. शेतजमीन आहे. गत तीन-चार वर्षांपासून एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे सतत नापिकी झाली. परिणामी, शेताचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यातच २०२० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून एक लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. डोक्यावरील कर्जाचा बोजा कसा फेडावा, या विवंचनेत ते होते. यात ३० जुलै रोजी सकाळी ते घरातून शेताकडे गेले. परंतु घरी परत आले नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहिले असता, बाजीराव वडकुते यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती गोरेगाव ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद झळके व पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी गंगाधर वडकुते यांनी दिलेल्या माहिती वरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे जमादार मंचक ढाकरे पुढील तपास करीत आहेत













