हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली: जिल्ह्यात सोमवारी दि 21/7/2025 रात्रीपासून बरडा पिंपरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारातील महादेव मंदिरातच्या परिसरात सगळीकडे पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे तिघे जण अडकून पडले असून घटनास्थळी महसूल प्रशासनाचे पथक दाखल झाले आहे. तर आज सकाळी पाणी उतरण्यास सुरवात झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी ता. 21 रात्री पासून जिल्हाभरात पाऊस सुरु होता. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होता. या पावसामुळे नदी, नाले भरून वाहू लागले असून मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारातून सरस्वती नदी वाहते. जालना जिल्हयातील मंठा व बुलडाणा जिल्ह्यातील लोणार परिसरात मोठा पाऊस झाल्यास या नदीला पूर येतो. बरडा शिवारात महादेव मंदिर असून त्या ठिकाणी शिवेंद्र महाराज पुजेसाठी राहतात. या भागात पाऊस असल्यामुळे परिसरातील शेतकरी सुभाष सानप व काकड महाराज हे दोघे पाऊस येत असल्यामुळे बरडा शिवारातील महादेव मंदिरात
मुक्कामी गेले होते. मात्र पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सरस्वती नदीला मोठा पुर आल्याने पुराचे पाणी महादेव मंदिरात शिरले. त्यानंतर तिघेही मंदिराच्या छतावर गेले. त्या ठिकाणावरून गावकऱ्यांशी संपर्क साधला.
बरडा शिवारात मंदिरात तिघे जण पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तातडीने तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांचे पथक दाखल झाले. या शिवाय गावकरी प्रल्हाद योगेश वऱ्हाड, परमेश्वर सानप, उध्दवराव सानप, सानप, एकनाथ सानप, संतोष वऱ्हाड यांच्यासह गावकरी एकत्र आले आहेत. दरम्यान, सध्या नदीच्या पुराचे पाणी कमी होत असल्यामुळे पुरात अडकलेल्या तिघांना कुठलाही धोका नाही. पुढील काही वेळातच त्यांना बाहेर काढले जाणार असल्याचे गावकरी प्रल्हाद सानप यांनी सांगितले.













