प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
परतवारी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी टेकविला नामदेवाचरणी माथा…
हिंगोली पंढरपूच्या विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नर्सी नामदेव या ठिकाणी ता.२१ जुलै रोजी कामिका परतवारी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील लाखो भाविक संत नामदेव महाराज यांच्या चरणी माथा टेकवून नतमस्तक झाले.
परतवारी कामिका एकादशी निमित्त सोमवारी सकाळी भल्या पहाटे “श्री” च्या वस्त्र समाधीची आ तान्हाजी मुटकुळे, भिकुलाल बाहेती, भिकाजी कदम,ओमप्रकाश हेडा यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत महापूजा करण्यात आली. तर भिकुलाल बाहेती यांनी श्री च्या वस्त्र समाधीस मानाचा आहेर अर्पण केला.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत भुजबळ,उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार,सचिव द्वारकादास सारडा,भागवत सोळंके,रमेश महाराज,मनोज आखरे, राहुल नाईक, तोष्णीवाल,मंडळ अधिकारी सोनाली अरगडे,तलाठी मंजूताई हटकर,ज्ञानेश्वर किर्तनकार, नागेश गायकवाड, वैभव पातळे,कवी शिवाजी कऱ्हाळे आदी संस्थानचे पदाधिकारी भाविक उपस्थित होते.
महापुजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी भल्या पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती.भाविकाचे जत्थेच्या जत्थे हे मिळेल त्या वाहनाने नर्सी येथे दाखल झाले होते.तर काही ठिकाणाहून पायदळ दिंड्या खांद्यावर भगवी पताका मुखी पांडुरंग हरी नामाचा गजर करीत दाखल झाल्याने मंदिर परिसर ते बसस्थानक रस्ता दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो विष्णवांचा मेळा भरतो तर परतवारी एकादशीला संत नामदेवाचे जन्म ठिकाण असलेल्या नर्सी येथे नामदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे नर्सी हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते आषाढी एकादशीला जे भाविक पंढरीची वारी करतात ते भाविक परतवारी एकादशीला संत नामदेव महाराजांचे दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करतात.
संत नामदेवाची परतवारीची वारी पूर्ण न केल्यास पंढरीच्या विठ्ठलाची वारी पूर्ण होत नाही अशी भाविकांचे अनेक वर्षापासूनची भावनिक धारणा आहे. परतवारी एकादशीला विशेष असे महत्त्व असून या दिवशी संत नामदेवाचे दर्शन घेतल्याने भाविकांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे लाखो भाविक परतवारी एकादशीला संत नामदेवाचे दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करतात.
भाविकांची अलोट गर्दी कडेकोट बंदोबस्त..
परतवारी कामिका एकादशीला संत नामदेवाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात त्याअनुषंगाने कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे सपोउपनि अशोक जाधव, यांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना भाविक ओमप्रकाश हेडा यांच्याकडून उपवासासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
नर्सी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांचे आरोग्य पथक व विज पुरवठा सहाय्यक अभियंता बेलसरे यांचे विद्युत कर्मचारी दिवसभर मंदिर परिसरात सेवेसाठी उपस्थित होते. परतवारी निमित्त नरसी नामदेव येथे येणाऱ्या भक्तांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सुविधामार्फत माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर शुभम रोडगे, डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भैया ठाकूर, भिकुलाल बाहेती बद्रीनाथ घोंगडे, संदीप शिंदे बंडू उर्फ राम मुटकुळे, विठ्ठल वाबळे उपस्थित होते.













