April 21, 2026 12:28 am

हिंगोली: नरसी नामदेव येथे परतवारी उत्साहात! एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले संत नामदेव महाराजांचे दर्शन

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे 

हिंगोली :संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी एकादशी निमित्त शेकडो दिंड्या नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे परतवारी निमित्त सोमवारी ता. २१ पहाटे अडीच वाजल्यापासून संत नामदेव महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला सुरवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे दिड लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. तर दुसरीकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरुच होता. त्यामुळे आज नर्सी मध्ये प्रती पंढरपूर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला दर्शनासाठी गेलेले भाविक पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामीका एकादशीला संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे दर्शनासाठी येतात. या दर्शना नंतरच वारी पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी यावेळी सुमारे ४ लाखा पेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थान प्रशासन, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने चोख व्यवस्था केली.

दरम्यान, रविवारी ता. २० मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासूनच भाविक दर्शन रांगेत उभे होते. भाविकांची गर्दी वाढल्यानंतर पहाटे अडीच वाजता दर्शन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दर्शनासाठी तीन रांगांनी भाविक मंदिरात येत होते. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम तसेच हरि नामाच्या गजरात भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे दिड लाख भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी सात वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, भिकाजी कदम, भिकुलाल बाहेती, ओम हेडा, द्वारकादास सारडा, मनोज आखरे, ब्रिजमोहन तोष्णीवाल, राहुल नाईक यांच्यासह विश्वस्त व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी चार भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली. तसेच दर्शन रंगेत येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही विविध संघटनांकडून करण्यात आली. या शिवाय व्यापारी ओम हेडा यांच्या वतीने १०० क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जात आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी हिंगोली, परभणी, जिंतूर, रिसोड, वसमत आगाराने जादा बसेस सोडल्या आहेत. भाविक देखील मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी येऊ लागले आहेत. भाविकांच्या गर्दीने नर्सी नामदेव येथे प्रती पंढरपूरच अवतरल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें