जिल्हा प्रतिनिधी वाशिम गजानन पवार
एका गरीब महिलेच्या उदरनिर्वाहासाठी दिला लॉन्ड्री व्यवसाय सुरू करून.
वाशिम:-समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या वज्रदेही महिला विकास संघातर्फे एक प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संघाच्या संस्थापक अध्यक्षा यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून एका गरीब महिलेला उदरनिर्वाहासाठी लॉन्ड्री व्यवसाय सुरू करून दिला.
सदर महिला आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत होती. तिची परिस्थिती लक्षात घेऊन वज्रदेही महिला विकास संघाने पुढाकार घेत आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री व दुकानाची व्यवस्था करून दिली. या माध्यमातून संबंधित महिलेला स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे.
यावेळी आयोजित साध्या पण अर्थपूर्ण उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांनी संस्थापक अध्यक्षांच्या त्यागभावना आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “दान करण्यापेक्षा रोजगाराची संधी देणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे मत कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
वज्रदेही महिला विकास संघाचा हा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरत असून, समाजातील इतर संस्थांसाठीही तो आदर्श ठरणार आहे.













